अन्यथा आंदोलन करण्याचा गावकरी वाशीयांनी दिला इशारा
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
प्रधान मुख्य कार्यालयाला 600 नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन
सिंदेवाही – बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वासेरा चे सिंदेवाही येथे विलीनीकरण करून सदर शाखेचे लवकरच स्थानांतरण करण्यात येणार असल्याचे पत्र बँकेच्या इमारती मालकाला प्राप्त होताच गावात एकच खळबळ उडाली असून सदर बँकेचे स्थानांतरण रद्द करण्यात यावे याकरिता वासेरासह परिसरातील शिवणी, सिरकाडा, पारना, पांढरवाणी , सिंगडझरी येथील 600 नागरिकांच्या स्वाक्षरीने मागणीचे निवेदन पुणे येथील प्रधान कार्यालय यांना पाठविण्यात आले आहे.
सिंदेवाही पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या वासेरा येथे ग्रामीण भागातील नागरिकांना सेवा देता यावी म्हणून मागील 32 वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्र कार्यरत आहे. या शाखेला परिसरातील शिवणी, सिरकाडा, पारना, कारवा, पांढरवाणी , पिंपरहेटी , सिंगडझरी, गडबोरी, जामसाळा जुना, नवीन ही गावे जोडलेली आहेत. सध्या सदर शाखेत जवळपास 5 हजारांच्या वरून ग्राहक असून परिसरातील 200 महिलांचे बचत गट वरील शाखेला जोडलेले आहेत. बचत गटाच्या महिला दरवर्षी बँक ऑफ महाराष्ट्र कडून 2 करोड रुपयांहून अधिक कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड करतात. तसेच शेतकरी वर्ग आपल्या शेतीसाठी पीक कर्ज सुद्धा घेत असतात. वासेरा येथील किराणा दुकानदार याच शाखेसोबत आर्थिक व्यवहार करतात. गावात दोन बियर बार, सुरू असून लवकरच एक देशी दारूचे दुकान आणि पेट्रोल पंप सुरू होण्याच्या मार्गावर आहे. परिसरातील 3 वनपरिक्षेत्र कार्यालय, शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक खाते, प्राथमिक आरोग्य केंद्राचे खाते, ग्राम पंचायत कार्यालयाचे विविध खाते सुद्धा याच शाखेमधून काढण्यात आले आहेत. असे असताना सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वासेरा ही डबघाईस आली असल्याचे बोलल्या जात आहे. तसेच नुकतेच सदर शाखेचे विलीनीकरण करण्याची मंजुरी प्राप्त झाली असून लवकरच बँक शाखा सिंदेवाही येथे स्थानांतर करण्यात येणार असल्याचे पत्र बँक इमारतीच्या मालकाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली असून सदर बँक गावातून जावू देण्यास गावकऱ्यांनी सक्त विरोध केला आहे. त्यामुळे गावातील काही जागरूक नागरिकांनी वासेरा सह परिसरातील 8 गावातील 600 नागरिकांच्या प्रत्यक्ष निवेदनावर स्वाक्षरी घेऊन याबाबत पुणे येथील प्रधान कार्यालय बँक ऑफ महाराष्ट्र यांना शाखा व्यवस्थापक यांचे मार्फत निवेदन देण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजू नंदनवार, महेंद्र कोवले, नूतन बोरकर, तानाजी लेंजे, लोकनाथ बोरकर उपस्थित होते. त्यासोबतच ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार, चिमूर चे आमदार बंटी भांगडिया, खासदार नामदेवराव किरसान, जिल्हाधिकारी यांनासुद्धा निवेदनाच्या प्रति देण्यात आल्या आहेत.






