सुनील गेडाम पत्रकार यांचा लेखणीचा गोरगरीब तसेच सिंदेवाही तालुक्याचा लोकांना फायदा.
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही:
ग्रामीण भागातील गोरगरीब आणि गरजू रुग्णांसाठी एकमेव मोठा आधार म्हणजे तालुक्यातील ‘ग्रामीण रुग्णालय, सिंदेवाही’. शासकीय रुग्णालयात जिवंत व्यक्तीवर मोफत उपचाराची सोय असली, तरी दुर्दैवाने अपघात, आत्महत्या किंवा आजाराने मृत्यू झाल्यास मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी (Post-Mortem) मृतकाच्या नातेवाईकांकडून उघडपणे पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार सुरू होता. तालुक्यातीलच नव्हे, तर अनेक शासकीय रुग्णालयांत असा प्रकार चालत असतानाही या गंभीर मुद्द्याकडे मीडियाने दुर्लक्ष केले होते.
मात्र, गोरगरीब जनतेची होणारी ही सर्रास लूट रोखण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ‘दैनिक वादळ वार्ता’ चे प्रतिनिधी सुनील गेडाम यांनी आपल्या निर्भीड लेखणीच्या माध्यमातून प्रशासनाला थेट जाब विचारला.
’त्या’ वृत्ताने थेट जिल्हा प्रशासन हादरले!
शवविच्छेदन मोफत असते की त्याचे पैसे द्यावे लागतात, याची साधी माहितीही सर्वसामान्य नागरिकांना नव्हती. याच अज्ञानाचा फायदा घेतला जात होता. मात्र, पत्रकार सुनील गेडाम यांच्या जागरूक आणि दणकेबाज वृत्ताची दखल थेट जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागली. या बातमीमुळे तालुका ते जिल्हा आरोग्य प्रशासनात एकच खळबळ उडाली आणि अधिकाऱ्यांना तात्काळ जाग आली.
रुग्णालयात झळकला ‘मोफत शवविच्छेदन’चा फलक!
बातमीचा दणका बसताच सिंदेवाही ग्रामीण रुग्णालयातील शवविच्छेदन कक्षाबाहेर “शवविच्छेदनासाठी कुठलेही शुल्क लागत नाही” असा स्पष्ट फलक प्रशासनाला लावावा लागला. त्यामुळे आता मृतदेहाच्या विच्छेदनासाठी एकाही रुपयाची लाच किंवा अवाजवी पैसे द्यावे लागणार नाहीत.
जनहितार्थ पत्रकारितेचे सर्वत्र कौतुक!
आजच्या काळात जिथे जनतेच्या मूलभूत प्रश्नांना बाजूला सारून निष्फळ बातम्यांवर भर दिला जातो, तिथे दैनिक वादळ वार्ता आणि पत्रकार सुनील गेडाम यांनी दाखवलेल्या या धाडसाचे आणि जनहितार्थ पत्रकारितेचे संपूर्ण सिंदेवाही तालुक्यात जोरदार स्वागत व कौतुक होत आहे. एका खऱ्या पत्रकाराच्या निर्भीड लेखणीने गरिबांना न्याय मिळवून दिला, अशीच चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.







