श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
नवरगाव : नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत अंतर्गत आभा (ABHA) कार्ड योजना मोफत राबविण्यात येत असून सिंदेवाही तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमधुन खाजगी व्यक्ती १०० रुपये घेऊन नागरीकांची आर्थीक लुट करीत आहे व प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे.
एखाद्या व्यक्तीची तब्येत गंभीर बिघडल्यास त्याला शासनाकडून पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळावेत, हा प्रमुख उद्देश असुन शासन स्तरावरून आभा कार्ड काढण्यासाठी मोफत शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून ही सेवा पूर्णतः विनामूल्य असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र सिंदेवाही तालुक्यात या योजनेच्या नावावर मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. ग्रामपंचायतींचे सरपंच, पदाधिकारी व कर्मचारी यांना हाताशी धरून एक खाजगी व्यक्ती नागरिकांकडून प्रत्येकी १०० रुपये घेऊन आभा कार्ड काढून देत असल्याचा आरोप होत आहे. सदर व्यक्ती शासकीय संगणक, इंटरनेट व इतर शासकीय साधनसामग्रीचा वापर करून नागरिकांची नोंदणी करत असून, यासाठी आर्थिक देवाणघेवाण केली जात असल्याचेही बोलले जात आहे.
या संपूर्ण प्रकरणाकडे स्थानिक प्रशासन व आरोग्य विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. अनेक तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाची भूमिका संशयास्पद ठरत असून, दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे.






