शासकीय शौचालय पाडल्याप्रकरणी ग्रामपंचायत कमिटी संशयास्पद, उपोषणाचा इशारा
श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
देलनवाडी, ता. सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथे शासकीय योजनेतील मंजूर शौचालय व बाथरूम धमकी देऊन पाडल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून, या प्रकरणात संपूर्ण ग्रामपंचायत कमिटीची भूमिका संशयास्पद ठरत आहे. सत्ताधारी सदस्यांच्या दडपशाहीखाली व कंत्राटदारच्या टक्केवारीखाली ग्रामपंचायत सरपंच व कमिटीने मौन बाळगल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.. तसेच लोकप्रतिनिधींच्या दडपशाहीखाली या प्रकरणात तहसीलदार, पोलीस स्टेशन व गटविकास अधिकारी (BDO) पूर्णतः मौन बाळगत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संशय व्यक्त केला जात आहे.
येथील रहिवासी अनिल बोरकर यांच्या स्वमालकीच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या परवानगीने व स्वच्छ भारत अभियानांतर्गत तीन ते चार वर्षांपूर्वी पक्के शौचालय व बाथरूम उभारण्यात आले होते. असे असतानाही ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप गोबडे यांनी स्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी,व ग्रामपंचायत मध्ये नाली बांधकाम संबंधी मंजुरी ठराव नसतांना दुसरीकडे मंजूर असलेली नाली बांधकाम, स्वतःच्या घराकडे नाली बांधकाम करण्यासाठी बांधकाम कंत्राटदार श्री. सुनील माधव गोबडे यांच्या मदतीने मारहाणीची धमकी देत कोणतीही नोटीस, ठराव किंवा कायदेशीर प्रक्रिया न करता हे बांधकाम जमीनदोस्त केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर ग्रामपंचायत कमिटीने आपत्कालीन सभा न बोलावणे, निषेधाचा ठराव न करणे किंवा वरिष्ठ प्रशासनाला अहवाल न पाठवणे हे प्रश्न उपस्थित करत आहे. ग्रामपंचायत सरपंच व कमिटी सत्ताधारी सदस्यांच्या व कंत्राटदारांच्या दबावाखाली जाणीवपूर्वक गप्प आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.
या बेकायदेशीर कारवाईमुळे गरीब कुटुंबातील महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास व आंघोळीस जाण्याची वेळ आली असून, हा प्रकार म्हणजे स्वच्छ भारत अभियानाची उघड विटंबना व मानवी हक्कांवर थेट घाला असल्याची तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पीडित कुटुंबाने तहसीलदार, पोलीस स्टेशन, BDO, जिल्हाधिकारी तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने, आता ग्रामपंचायत कार्यालय व तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची संपूर्ण जबाबदारी ग्रामपंचायत कमिटी व प्रशासनाची राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.






