ग्रामपंचायत सदस्यावर दडपशाही व पदाचा गैरवापर केल्याचा आरोप
श्री अमोल निनावे
संपाद्क:- झुंज सत्याची
मो. नं. 9764271316.
देलनवाडी, ता. सिंदेवाही (जि. चंद्रपूर) येथे ग्रामपंचायत सदस्याकडून सत्तेचा गैरवापर करत गरीब नागरिकाचे शासकीय योजनेतील मंजूर शौचालय व बाथरूम धमकी देऊन पाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
येथील रहिवासी अनिल रामुजी बोरकर यांच्या स्वमालकीच्या जागेत ग्रामपंचायत कार्यालयाच्या परवानगीने व शासनाच्या स्वच्छता योजनेअंतर्गत तीन ते चार वर्षांपूर्वी पक्के शौचालय व बाथरूम बांधण्यात आले होते. मात्र ग्रामपंचायत सदस्य श्री. दिलीप गोबडे यांनी स्वतःचे अतिक्रमण वाचवण्यासाठी, बांधकाम कंत्राटदार श्री. सुनील माधव गोबडे यांच्या मदतीने कोणतीही कायदेशीर नोटीस, आदेश किंवा ठराव नसताना मारहाणीची धमकी देत हे बांधकाम जबरदस्तीने पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या घटनेचा गंभीर परिणाम म्हणजे गरीब कुटुंबातील महिला व लहान मुलांना उघड्यावर शौचास व आंघोळीस जाण्याची वेळ आली आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षिततेचा, आरोग्याचा व सन्मानाचा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रकार स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासणारा असल्याची तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
या प्रकरणामुळे देलनवाडी परिसरात संतापाचे वातावरण असून लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे हुकूमशाही पद्धतीने वागणे लोकशाही व्यवस्थेला काळीमा फासणारे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. पीडित अनिल बोरकर यांनी पोलीस, पंचायत समिती, जिल्हाधिकारी व मानवाधिकार आयोगाकडे तक्रारी दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून दोषींवर कठोर कारवाई व तात्काळ पुनर्बांधणीची मागणी केली आहे.






