◼️ वनविभाग व महसूल प्रशासनाचा संशयास्पद मौन- नागरिकांचा संताप ◼️
श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
सिंदेवाही: तालुक्यातील भेंडाळा, पळसगाव तसेच परिसरातील विविध घाटावरून दररोज रात्री ट्रॅक्टरद्वारे बिनधास्तपणे रेतीची तस्करी सुरू आहे. ही तस्करी सुरू असताना, वन्यप्राण्याच्या जीविताला धोका निर्माण होत असतानाही वन विभाग डोळेझाक का करीत आहे? असा थेट सवाल संतप्त नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे.
डोंगरगाव येथील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार दररोज रात्री दहा वाजल्यानंतर गोसीखुर्द कालव्याच्या कामासाठी तसेच इतर गावांना रेतीपुरवठ्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. हा कालवा वन विभागाच्या घनदाट जंगलातून जात असून, याच मार्गाने वाघ, बिबट्या, हरीण, चितळ, सांबर यासारखे वन्यप्राणी ये- जा करतात.
अशा परिस्थितीत रात्रीच्या अंधारात सुरू असलेली रेती तस्करी, ही वन्यप्राण्यासाठी गंभीर धोका ठरत आहे. यामुळे प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास बिघडून, वन्यप्राणी पलायन करण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब अत्यंत गंभीर आणि चिंताजनक आहे.
इतका मोठा प्रश्न निर्माण होऊनही वनविभाग कुंभकर्णी निद्रेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे या तस्करीत वन विभागातील काही अधिकारी किंवा कर्मचारी सहभागी आहेत काय? असा संशय व्यक्त केला जात असून, प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दुसरीकडे सिंदेवाही ते मरेगाव तसेच सिंदेवाही
परिसरातील जवळपास सर्वच रस्त्यावरून, मोठ्या प्रमाणात रेती वाहतूक सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. ठीकठिकाणी घरकुल योजना, रस्ते, पुल तसेच खाजगी बांधकामे सुरू असून, दिवसा मोफत रेती वाहतुकीचा वापर करून, रात्री शहरात बेकायदेशीर रेती साठवणूक केली जात आहे. मोठमोठ्या इमारती समोर रेतीचे ढिग सर्रासपणे पडलेले दिसत असताना, महसूल विभाग मात्र ठामपणे दुर्लक्ष करत आहे.
एखादे वेळेस दिखाऊ स्वरूपात एखादी ट्रॅक्टर पकडून कारवाईचा गाजावाजा केला जातो. मात्र दररोज सुरू असलेल्या प्रचंड प्रमाणातील तस्करीकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष केले जात आहे. हे जनतेला स्पष्टपणे जाणवत आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत वरीष्ठ अधिकारी यांचेकडे रितसर तक्रार दाखल करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली जाणार आहे. जर तात्काळ कारवाई झाली नाही, तर जन आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






