मागील 3 वर्षापासून प्रशासनाचे दुर्लक्ष
अमोल निनावे
संपादक:-झुंज सत्याची
मो. न. 9764271316
सिंदेवाही :- पंचायत समिती सिंदेवाही अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरवाही येथे शाळेला इमारत नसल्याने मागील 3 वर्षापासून गावातील मंदिरात शाळा भरविण्यात येत असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे.
सिंदेवाही तालुक्यातील उमरवाही ( उटी) ही गट ग्राम पंचायत असून येथे जिल्हा परिषदेचे 1 ते 4 वर्ग आहेत. या शाळेत अंदाजे 45 ते 50 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शाळेची इमारत खूप जुनी झाली असून पडक्या अवस्थेत असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी वर्गखोली उपलब्ध नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून गावकऱ्यांनी गावातील हनुमान मंदिरातील एक खोली विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे सध्या काही विद्यार्थी मंदिराच्या खोलीमध्ये शिक्षण घेत आहेत. असे असले तरी शाळेच्या इमारतीची मागील 4 वर्षापासून ग्राम पंचायत कडून मागणी करून पाठपुरावा करण्यात आला. त्यानुसार एक वर्गखोली साठी निधी मंजूर झाला. जुनी शाळा गावाच्या मध्यभागी असल्याने गावातील कोणत्याही कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांना त्रास होत होता. त्यामुळे गावाबाहेरील ५ एकराची खुली जागा ग्राम पंचायतचे नावाने करून त्या जागेवर शाळेचे इमारत बांधकाम करण्यात आले. परंतू त्या ठिकाणी पाण्याची सोय नाही, विद्युत सोय नाही, तसेच शाळा गावाबाहेर असल्याने त्याठिकाणी संरक्षण भिंत असणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे ग्राम पंचायत कार्यालयाने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी अंतर्गत संरक्षण भिंतीचा प्रस्ताव तयार करून मंजूर केला . गट विकास अधिकारी यांनी सदर काम करण्यासाठी कार्यारंभ आदेश दिला. त्यानुसार संरक्षण भिंतीचे काम सुद्धा सुरू झाले. मात्र अचानक पंचायत समिती कडून सदर बांधकाम बंद करण्याचे आदेश आले असल्याने ग्राम पंचायत कडून ते बांधकाम थांबविण्यात आले आहे. याबाबत ग्राम पंचायत आणि गावकऱ्यांनी अनेकदा मुख्यकार्यकारी अधिकारी यांना भेटून शाळेबद्दल समस्या सांगितल्या. मात्र निगरगट्ट प्रशासन अजूनही सुस्त असल्याने उमरवाही येथील विद्यार्थ्यांना मंदिरात बसून ज्ञानार्जन करावे लागत आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाने या गंभीर समस्येकडे त्वरित लक्ष घालून येथील जिल्हा परिषद शाळेच्या समस्या मार्गी लावाव्यात अशी मागणी सरपंच निता दिनेश बोरकर यांनी माध्यमातून केली आहे.






