श्री अमोल निनावे
संपाद्क :-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही: समोर तळपत्या उन्हात, घामाच्या धारांतून,उद्याचे जग पाहणारा मी,भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद होते…मात्र, येथे गरिबांच्या हक्काच्या भाकरीवर आणि घामाच्या पैशावर डल्ला मारून स्वतःची तिजोरी भरणाऱ्या भ्रष्ट व्यवस्थेने कळस गाठला आहे. याच व्यवस्थेच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि भ्रष्टाचाराची ही साखळी तोडण्यासाठी जनता टाइम्स फाऊंडेशनचे संचालक सुनील गेडाम यांनी कलम से क्रांतीच्या माध्यमातून सिंदेवाही प्रशासकीय भवनासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.
एकाच वेळी दोन कार्यालयातून पगार
सिंदेवाही तालुक्यात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. याचे जिवंत उदाहरण म्हणजे तालुका कृषी अधिकारी कार्यालय. येथे कंत्राटी कॉम्पुटर ऑपरेटर म्हणून नियुक्त असलेल्या एका व्यक्तीने, वन परिक्षेत्र अधिकारी (सामाजिक वनीकरण) कार्यालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी संगनमत करून चक्क दोन्ही शासकीय कार्यालयातून पगार उचलण्याचा पराक्रम केला आहे. सामान्य माणसाला जिथे एक वेळच्या अन्नासाठी वणवण करावी लागते, तिथे अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने शासकीय तिजोरीवर दिवसाढवळ्या डल्ला मारला जात आहे. भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हा प्रकार घडणे अशक्य आहे, हे उघड सत्य आहे. या भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित ‘डल्लामार’ कर्मचारी व त्याला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी जनता टाइम्स फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. सुनील गेडाम यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या आंदोलनाला आता जनआंदोलनाचे स्वरूप प्राप्त होत आहे. या भावनेतून सिंदेवाहीतील तरुण वर्ग आणि जागरूक नागरिक मोठ्या संख्येने आज पहिल्या दिवशी आंदोलनात सहभागी झाले होते. सोमवार पासुन आंदोलनस्थळी प्रशासनाच्या कानावर समस्या ऐकु जाण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे.
प्रशासकीय भवनासमोर सुरू असलेले हे आंदोलन केवळ ठिय्या नसून, ती एका भ्रष्ट व्यवस्थेविरोधातील ‘क्रांतीची हाक’ आहे. जोपर्यंत दोषींवर कारवाई होत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांचे निलंबन होत नाही, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे. जनतेच्या पैशाची ही लूट अजून किती दिवस चालणार? हा सामान्य नागरिकांचा प्रश्न आहे हीच वेळ आहे सिंदेवाहीकरांनी या अन्यायाविरुद्ध एकवटण्याची!
जनतेच्या हक्कासाठी, भ्रष्टाचाराच्या नायनाटासाठी, सामील होण्याचे आवाहन या आंदोलनामध्ये सामील झालेले धनराज सरपाते, तेजेंद्र नागदेवते, अरुण मादेश्वर, सुभाष लोणारे, सलीम पठाण , स्वप्नील राऊत, धनंजय साखरे, गोकुल रामटेके, अंबादास दुधे, विवेक मोहुर्ले, दडमल साहेब
यांनी केले आहे.






