श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सिंदेवाही : अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या कष्टावर पाणी फेरले आहे. गुरुवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसामुळे शेतात कापणी करून ठेवलेले धान ओलाव्याने भिजले असून, शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक फटक्याला सामोरे जावे लागत आहे.
तालुक्यातील सर्व शेतातील कापलेले धान पावसाच्या तडाख्यात सापडले. मेहनतीने कापणी करून सुकविण्यासाठी ठेवलेले धानाचे कडपे भिजल्याने त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले आहे. या घटनेमुळे शेतकरी वर्गात निराशा आणि हताशेचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरण ढगाळ असले तरी पावसाची शक्यता कमी मानली जात होती. मात्र गुरुवारी संध्याकाळी आलेल्या मुसळधार सरींनी शेतकऱ्यांची चिंता वाढवली. धान ओलसर झाल्याने त्याची गुणवत्ता घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे सिंदेवाही परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून, प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. हवामानातील अनिश्चिततेने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या आयुष्याला धक्का दिला आहे.





