श्री अमोल निनावे
संपाद्क:-झुंज सत्याची
मो. नं. 9764271316
सावली :- पंचायत समिती, सावली येथे कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न झाले. तालुक्यातील नागरिकांHना विविध कायदे, शासनाच्या योजना तसेच नागरिकांचे हक्क याबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मा. ए. चव्हाण साहेब, न्यायाधीश (कनिष्ठ स्तर), सावली यांनी मार्गदर्शन करताना तालुक्यातील प्रत्येक गावागावात कायदेविषयक माहिती पोहोचविण्याचे आवाहन केले. कायद्याची माहिती ही केवळ न्यायालय किंवा शहरापुरती मर्यादित न राहता ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत पोहोचणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शिबिरामध्ये हुंडाबंदी, लिंग समानता, संविधानिक मूल्ये, महिलांचे अधिकार, आदिवासी हक्कांचे संरक्षण व अंमलबजावणी योजना २०१५, बालकांसाठी बालस्नेही कायदेविषयक सेवा योजना २०२४ तसेच शासनाच्या विविध कायदेविषयक योजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅड. श्री. लाडे, तसेच अॅड. ए. एन. गेडाम, अॅड. श्री. पी. पी. शेंडे, अॅड. श्री. गजभिये, अॅड. श्री. ठिकरे आदींनी विविध कायदेविषयक विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच अॅड. कु. दुधे यांनी महिलांच्या लैंगिक छळासंदर्भात मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. एस. एम. कवठे, विधी स्वयंसेवक यांनी केले. उपस्थित मान्यवरांचा परिचय श्री. डी. के. फुलबांधे, विधी स्वयंसेवक यांनी करून दिला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बि. के.मंगर सर, एस. चांदेकर,न्यायालयीन अधिकारी /कर्मचारी, विधी स्वयंसेवक, तालुका बार असोसिएशनचे अधिवक्ते तसेच महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“कायदा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचला पाहिजे आणि प्रत्येक गावात कायदेविषयक जनजागृती झाली पाहिजे,” असा संदेश या शिबिरातून देण्यात आला.






